ishantimes

शिक्षणातून राष्ट्रनिर्मिती : 'महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूर'ची शतकी वाटचाल

जबलपूर (ईशान टाइम्स)।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज जबलपूर, मध्य प्रदेश येथे ‘महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूर’चा शताब्दी समारंभ संपन्न झाला. यावेळी त्यांनी मंडळाला शताब्दी पूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या आणि या निमित्ताने मराठी समाज व शिक्षण तसेच महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्यातील अतूट नाते अधोरेखित केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी, राष्ट्रनिर्मितीसाठी संस्कारित आणि स्वातंत्र्यप्रेमी नागरिक घडवून सक्षम पिढी तयार करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र शिक्षण मंडळ’ या संस्थेची पायाभरणी करण्यात आली, त्यामागे मराठी माणसाचा भाषा आणि संस्कृतीच्या प्रसाराचा दृष्टिकोन होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसोबत स्वधर्म आणि स्वभाषेचा दिलेला नारा, स्वातंत्र्यपूर्व काळातही कराची, तेव्हाचे हैदराबाद, जे आता पाकिस्तानात आहे त्या ठिकाणी सुरू असलेल्या मराठी शाळा आणि अफगाणिस्तानपर्यंत रुजलेली मराठी भाषा आणि शिक्षण संस्कृती ही मराठी माणसाच्या व्यापक आणि वैश्विक विचारांचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांचे ऐतिहासिक नाते होळकर, शिंदे आणि पवार घराण्यांच्या माध्यमातून दृढ झाले असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा उल्लेख केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भारतातील प्रत्येक भाषेत ज्ञान आणि संस्कृती दडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षणाला, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणालाही महत्त्व दिले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूर’ यांनी मराठी शिक्षणाच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी महाराष्ट्र सरकार आवश्यक सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, आधुनिक काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत असून नव्या तंत्रज्ञानासह AI चे युग सुरू झाल्याने, ‘विकास भी और विरासत भी’ या संकल्पनेला अनुसरून शिक्षण संस्था सांस्कृतिक वारसा जपत आधुनिक शिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारतील आणि त्यात ‘महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूर’ पुढाकार घेईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (ऑनलाईन), मंत्री राकेश सिंह, मंत्री उदय प्रताप सिंह, ‘महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूर’चे अध्यक्ष डॉ. जयंत तनखीवाले, खासदार, आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top